धुळे हादरलं ! आई-वडिलांसह दोन मुलांची आत्महत्या

धुळे : काही दिवसांपूर्वी नाशिकमधल्या पाथर्डी फाट्यावरील सराफ नगरमध्ये आई, वडील आणि मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता धुळ्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शहरातील प्रमोद नगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई-वडिलांसह दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
प्रवीण मानसिंग गिरासे, दीपा प्रवीण गिरासे, मितेश प्रवीण गिरासे, सोहम प्रवीण गिरासे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत. प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान असून पत्नी आणि दोन मुलांसमवेत ते प्रमोद नगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते. मात्र, मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसत होते. प्रवीण गिरासे यांची बहीण या आज सकाळच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आला होता. तो त्यांनी उघडला असता चौघेही मृत अवस्थेमध्ये आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या चौघांनी अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत.





