पुणे : – गाडी आडवी घातल्याने, नीट चालव म्हटल्याचा राग मनात धरून लोखंडी गजने मारहाण करून
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात आई-लेकीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजुर केला.
शोभा भगवान लाड आणि तिची मुलगी कोमल अशी त्या दोघींची नावे आहेत. दोघींनी अॅड. भालचंद्र पवार, अॅड. योगेश पवार, अॅड. अक्षय रतनगिरी आणि अॅड. स्वप्निल गांगुर्डे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
भगवान महादु लाड (वय 52) आणि त्याचा मुलगा अमोल (वय 23, दोघेही, रा. निमोणे, ता. शिरूर) या दोघांना यापूर्वीच नियमित जामीन मिळाला आहे. शरद आनंदराव ढोरवजकर (वय 35, रा. निमोणे, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 8 सप्टेंबर 2019 रोजी ही घटना घडली.
फिर्यादी हे एस.टी.स्टॅण्डवर चायनीज आणण्यासाठी चालले होते. त्यावेळी भगवान याचा मुलगा मनोज याने गाडी आडवी घातली. त्यावेळी फिर्यादीनी गाडी नीट चालव, असे त्याला म्हटले. याचा राग मनात धरून कुटुंबातील पाच जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करून फिर्यादींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच, फिर्यादींच्या पत्नीलाही हात, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.