“आई-बाबा मला माफ करा…”; UPSCची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या

UPSC Student Suicide | गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय नागरी लोकसेवा परीक्षेबाबत चर्चा सुरू आहे. दिल्लीतील कोचिंग सेंटरमध्ये साचलेल्या पावसात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर एका विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. तसेच महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण यामुळे सध्या युपीएससीच्या विद्यार्थांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
यातच आता अकोल्यातील एका युपीएससीच्या विद्यार्थिनीने दिल्लीत आत्महत्या केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोल्यातील गंगानगर भागातील अंजली गोपनारायण या दिल्लीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने 21 जुलैला आत्महत्या केली. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने अनेक धक्कादायक बाबींवर लिहिले आहे. UPSC Student Suicide |
अंजलीने दिल्लीत राहत असलेल्या जुने राजेंद्रनगर भागातील आपल्या भाड्याच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केली. अभ्यास आणि परीक्षेमुळे येणारा ताण, परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार, शिकवणी वर्ग, वस्तीगृह आणि दलाल यांच्याकडून होणारी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक यातून तिने जीवन संपवले आहे. UPSC Student Suicide |
अंजली ही अकोल्यातील गंगानगर परिसरातील रहिवासी आहे. तिचे वडील अनिल गोपनारायण हे पोलीस मुख्यालयात एएसआय आहेत. तिनं बीएससी कृषी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी दिल्लीला यूपीएससीचे क्लासेस करण्यासाठी गेली होती. सुरुवातीला एक वर्ष करोल बाग परिसरात ती राहिली. त्यानंतर एक वर्षांपासून ती राजेंद्र नगरमध्ये राहत होती.
सुसाइड नोटमध्ये काय लिहिले?
सुसाइड नोटमध्ये तिने तिच्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. “आई-बाबा मला माफ करा. मी आता आयुष्याला कंटाळले आहे. माझ्यासमोर फक्त समस्याच आहेत. मला आता शांततेची गरज आहे. या नैराश्येतून मुक्त होण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मी नैराश्येतून मुक्त होऊ शकले नाही. त्यावर मात करू शकले नाही. पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास व्हावी असं माझं स्वप्न होतं.”
पुढे तिने लिहिले की, “कृपया सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा आणि रोजगार निर्माण करा. नोकरीसाठी अनेक तरुण धडपडत आहेत. पीजी आणि वसतिगृहाचे भाडेही कमी केले पाहिजे. हे लोक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे लुटत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ते परवडणारे नाही”, असे प्रश्न तिने यावेळी सुसाइड नोटमधून मांडले आहेत.
दरम्यान, मानसिक तणाव, शिकवणी वर्ग आणि घराच्या वाढलेल्या भाड्यामुळे अंजली तणावत असल्याचे या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता तरी सरकार केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींसाठी ठोस भूमिका घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा:





