मोटेवाडीचा पाझर तलाव मे महिन्यात ओसंडला; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

निमोणे (शिरूर): ‘आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना’ या म्हणीप्रमाणे यंदा वरुणराजाने मे महिन्यातच महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मोटेवाडी येथील पाझर तलाव, जो अनेक दशकांपासून कोरडा पडला होता, तो यंदाच्या पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात ओसंडून वाहू लागला. यामुळे मोटेवाडी, चव्हाणवाडी, लंघेवाडी आणि दुर्गेवस्ती येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
यावर्षी मे महिन्यातच महाराष्ट्रात पावसाने जोरदार सलामी दिली. शिरूर तालुक्यात सलग पाच ते सहा दिवस पावसाने हजेरी लावल्याने ओढे, नाले, विहिरी आणि पाझर तलाव तुडुंब भरले. मोटेवाडीचा पाझर तलाव १०० टक्के भरल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.
ज्येष्ठ नागरिक दौलतराव येलभार म्हणाले, “गेल्या १०० वर्षांत मे महिन्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याचे आठवत नाही. यंदाच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. तलाव आटल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता, पण आता तात्पुरता का होईना, हा प्रश्न सुटला आहे.”
या पावसामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढली असून, शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी बळ मिळाले आहे. मोटेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी वरुणराजाच्या या कृपेसाठी आभार मानले असून, येणारा हंगाम समृद्ध होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.





