Ashtavinayak Temples : अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत तसेच पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन व दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर मोरगावचे श्री मयुरेश्वर, थेऊरचे श्री चिंतामणी आणि सिद्धटेकचे श्री सिद्धिविनायक मंदिरे रविवार (दि. १०) पासून सुमारे महिन्याभरासाठी भाविकांसाठी बंद राहणार आहेत, साधारण ९ जूनच्या कालावधीत ही मंदिरे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाने दिली. (Ashtavinayak Temples) विभागाकडून मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते तसेच, कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Ashtavinayak Temples) यासाठी विभागाने पुण्याच्या सह धर्मादाय आयुक्तांकडे विनंती अर्ज केला होता. त्यानंतर विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेत सह धर्मादाय आयुक्तांनी मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Ashtavinayak Temples) ही विकासकामे मंदिरांची दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक असून ती नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी नागरिकांनी आणि भाविकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी केले आहे. नित्य पूजाअर्चा नियमित… मंदिरांमध्ये या कालावधीत नित्य पूजाअर्चा व धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा दर्शन घेता येणार नाही. तसेच, मंदिरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (Ashtavinayak Temples)