पुणे – सुरुवातीच्या काळात करोनाबाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, आता करोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात होतानाच करोनाची लागण होणाऱ्या रुग्णांमध्ये महिलांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 19 जूनअखेर एकूण 11135 बाधितांमध्ये सुमारे 5869 महिलांना तर सुमारे 4789 पुरुषांना बाधा झाली आहे. तर आतापर्यंत सुमारे 487 जणांचे मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत 3 तृतीयपंथींनाही करोनाची लागण झाली आहे.
करोनाची साथ जगभरात वाढत असतानाच, पुण्यासह, राज्यात 8 आणि देशातही पहिल्या टप्प्यात करोनाची बाधा होणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण पुरुषांचे होते. मात्र,आता लॉकडाऊन शिथिल होताना पुण्यात महिला बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यातही, 20 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 50 या वयोगटातील महिला रुग्णांची संख्या सुमारे 1 हजारच्या वर आहे. तर सर्वच वयोगटात पुरुष रुग्णांपेक्षा महिला रुग्णांची संख्या अधिक असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. तर एकूण रुग्णांच्या तुलनेत महिला बाधितांचे प्रमाण 53 ते 55 टक्के आहे.