प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रारूप मतदार यादी आता ६ नोव्हेंबरऐवजी १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात नवीन आदेश जारी केले आहेत. निवडणूक आयोगाकडून यापूर्वी देण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार उद्या (दि. ६) ही मतदार यादी जाहीर होणार होती. मात्र, काही महापालिकांनी याद्यांच्या विभाजनाचे काम अद्याप बाकी असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यामुळे आयोगाकडून सर्वच महापालिकांना मुदतवाढ देण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.निवडणूक आयोगाने यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ६ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. त्यानंतर हरकती व सूचना मागवून योग्य बदल करून १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करायची होती. मात्र, सुधारित वेळापत्रकानुसार आता १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. असे आहे सुधारीत वेळापत्रक – प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : १४ नोव्हेंबर २०२५ – हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख : २२ नोव्हेंबर २०२५ – हरकतींचा विचार करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : ६ डिसेंबर २०२५ – मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदार यादी जाहीर करणे : ८ डिसेंबर २०२५ – मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे : १२ डिसेंबर २०२५