Phaltan: ‘आपली फलटण मॅरेथॉन’मध्ये दोन हजारांहून अधिक स्पर्धक
Phaltan फलटणच्या जोशी हॉस्पिटल प्रा. लि.च्या माध्यमातून सलग १० वर्षे ‘आपली फलटण मॅरेथॉन’चे आयोजन करुन डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी केवळ फलटणच नव्हे, तर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोकांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच निसर्ग संरक्षण आणि अवयव दान या चळवळीला समाजात पोहोचवण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

Phaltan: फलटणकरांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासोबतच नियमित व्यायाम, धावणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या ‘आपली फलटण मॅरेथॉन २०२६’ स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.
फलटणच्या जोशी हॉस्पिटल प्रा. लि.च्या माध्यमातून सलग १० वर्षे ‘आपली फलटण मॅरेथॉन’चे आयोजन करुन डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी केवळ फलटणच नव्हे, तर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील लोकांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच निसर्ग संरक्षण आणि अवयव दान या चळवळीला समाजात पोहोचवण्याचे त्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले. यावेळी मॅरेथॉनच्या माध्यमातून समाजात आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या आयोजकांचे अभिनंदन करुन, स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या महिला व पुरुष धावपटूंना पारितोषिके प्रदान करून त्यांचा गौरव केला. डॉ. प्रसाद जोशी, डॉ. प्राची जोशी आणि जोशी रुग्णालयाच्यावतीने आयोजित या मॅरेथॉनने यंदा यशस्वी वाटचालीची दहा वर्षे पूर्ण केली आहेत. नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनात व्यायामाला महत्त्व द्यावे, आरोग्याची काळजी घ्यावी आणि सक्रिय जीवनशैलीचा स्वीकार करावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे- पाटील, माजी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. प्राची जोशी, अभिनेते समीर धर्माधिकारी, सौ. अपर्णा धर्माधिकारी, रणजितसिंह भोसले, भूलतज्ज्ञ डॉ. शरद धायगुडे आणि जोशी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसह फलटण तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने धावपटू उपस्थित होते.
यावर्षी विविध वयोगटातील एकूण २००० स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. २१ किलोमीटर गटात १५० पुरुष व ५० महिला (एकूण २००), १० किलोमीटर गटात ३०० पुरुष व १०० महिला (एकूण ४००), ५ किलोमीटर गटात २५० पुरुष व १५० महिला (एकूण ४००), ३ किलोमीटर गटात (झिप टॉप) ३०० पुरुष व २०० महिला (एकूण ५००), ३ कि. मी. (६५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी) ३०० पुरुष व २०० महिला (एकूण ५००) असे स्पर्धक सहभागी झाले. विविध विभागांतील विजेत्यांना प्रथम (१० हजार), द्वितीय (७ हजार) आणि तृतीय (५ हजार) अशी एकूण ७२ पारितोषिके ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आली.
गुडघ्यांचे प्रत्यारोपण झालेले ७५० हून अधिक रुग्ण सहभागी
यंदाच्या मॅरेथॉनमध्ये २१, १० आणि ५ किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धांसह ३ किलोमीटर आनंद फेरी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याच्या फेरीचे आयोजन करण्यात आले. अवयवदान जनजागृती, हाडे व सांध्यांचे आरोग्य आणि नियमित व्यायामाचे महत्त्वही या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुडघे प्रत्यारोपण झालेल्या ७५० हून अधिक रुग्णांची विशेष चालण्याची फेरी हे यंदाच्या मॅरेथॉनचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. योग्य उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय जीवन जगता येते, हा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आरोग्य आणि आनंदाची सांगड घालत फलटणमध्ये निरोगी जीवनशैलीची चळवळ पुढे नेणाऱ्या या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल सर्वांनी कौतुक केले





