1067 जणांना डिस्चार्ज : 16 रुग्णांचा मृत्यू 77 मेजर कन्टेन्मेंट तर 290 मायक्रो कन्टेंन्मेंट झोन जाहीर पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या अवघ्या चार दिवसांत दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मार्च 2020 मध्ये शहरामध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. गेल्या वर्षभरामध्ये 1 लाख 7 हजार 230 जणांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये करोना रुग्णांच्या संख्येचा आलेख खाली आला होता. शहरामध्ये दररोज सरासरी 100 ते 150 बाधित रुग्ण आढळत होते. मात्र 17 फेब्रुवारीपासून शहरातील बाधितांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. यादिवशी शहरामध्ये 235 नवीन बाधितांची नोंद झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल 5 हजार 331 जणांना करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच करोनाबाधित रुग्णांचा आलेख उंचावला आहे. मार्च महिन्याच्या चार दिवसांमध्ये तब्बल 1578 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातत्याने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येमुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच सोसायटी व इमारती कन्टेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात येत आहेत. आज प्रशासनाच्या वतीने 77 ठिकाणी मेजर कन्टेन्मेंट झोन केले आहेत. तर 290 मायक्रो कन्टेंन्मेंट झोन केले आहे. एका दिवसात 502 बाधित गुरुवारी चार वाजेपर्यंत शहरातील 502 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही बाधित रुग्णाची आज नोंद झाली नाही. तसेच आज दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील दापोडी, वाकड, थेरगाव व पिंपळे गुरव येथील चार जणांचा समावेश आहे. आजपर्यंत 2630 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1854 तर शहराबाहेरील 776 इतक्या रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरामध्ये 359 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 459 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2317 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 953 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या चार हजारांजवळ शहरामध्ये दररोज करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 1357 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 2560 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 3917 इतकी आहे. चार दिवसांतील करोनाबाधित दिनांक-रुग्ण-मृत्यू-डिस्चार्ज 1 मार्च-256-11-292- 2 मार्च-315-1-261- 3 मार्च-505-00-155- 4 मार्च-502-4-359-