पुणे – आषाढी वारीला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या पुणे विभागाकडून पाचशेहून अधिक जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. बुधवार (दि. २) पासून स्वारगेट आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार असून, भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई यासह अन्य संतांच्या पालख्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. ज्यांना पालखी सोहळ्याबरोबर चालणे शक्य होत नाही. ते पालख्या वाखरीजवळ पोहोचण्याआधीच पंढरपूरमध्ये गर्दी करतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक एसटीने पंढरपूरमध्ये येतात. दि. ६ जुलै रोजी आषाढी यात्रा असल्यामुळे उद्यापासूनच (दि. २ जुलै) स्वारगेट आगारातून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी एसटीच्या पुणे विभागाकडून ३२५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, तर अमरावती प्रदेशकडून १५० आणि कोकण विभागातून १५ जादा गाड्या आल्या आहेत. नियमित पंढरपूर मार्गावर धावणाऱ्या गाड्यांसह जवळपास पाचशे गाड्यांचे नियोजन केले आहे. नवीन बस, तसेच महिला तिकीट सवलतीमुळे प्रवाशांची गर्दी वाढत आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या तुलनेत यंदा एसटीकडून जादा गाड्या सोडल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. ग्रुप बुकिंगचे आवाहन एकाच गावातील वारकऱ्यांनी समूहाने एसटीचे बुकिंग केल्यास त्यांच्या गावातून गाडी सोडण्याची व्यवस्था एसटी प्रशासनाने केली आहे. त्यालाही काही भाविकांनी प्रतिसाद देत आतापर्यंत दहा गाड्यांचे बुकिंग झाले आहे. कोणी इच्छुक असल्यास भाविकांनी ग्रुप बुकिंग करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. कर्मचाऱ्यांना मोफत जेवण आषाढी एकादशीसाठी एसटीकडून एकूण ५ हजार २०० बसेसची व्यवस्था केली आहे. या बस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी यांच्यासह पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांना मोफत जेवणाची व्यवस्था केली आहे. दि. ५, ६ आणि ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भीमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक आणि पांडुरंग बसस्थानक याठिकाणी ही व्यवस्था असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.