11 जणांचा बळी : एकूण रुग्णसंख्या 19,431
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णसंख्येने 19 हजारांचा टप्पा पार केला आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी करोनाच्या रुग्णांमध्ये एक हजारहून अधिक रुग्णांची भर पडली. आज शहरात एकाच दिवशी तब्बल 1077 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बुधवारी शहरातील 1034 आणि शहराबाहेरील 43 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 19,431 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 3397 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 255 रुग्णांचाही समावेश आहे.
शहरात आजपर्यंत 393 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 311 व शहराबाहेरील 82 रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी दिवसभरात 11 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 8 तर शहराबाहेरील 3 रुग्णांचा बळी गेला.
शहरातील भोसरी, पिंपरी, दापोडी, चिंचवडगाव, दिघी, खराळवाडी, निगडी येथील आठ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये दापोडी येथील 27 व 32 वर्षीय दोन तरुणांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. तर शहराबाहेरील चाकण, पाषाण, शिरुर येथील तीन रुग्णांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात 316 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 12,278 इतकी झाली आहे.