प्रभात वृत्तसेवा पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेली अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहेत. जलसंपदा विभागाने मागील एका आठवड्यापासून सुरू केलेल्या धडक मोहिमेत खडकवासला, पानशेत, पवना , कासारसाई आदी धरणांच्या परिसरातील 300 हून अधिक अतिक्रमणे काढली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्ह्यात खडकवासला, वरसगाव, पानशेत, पवना, कासारसाई अशी मोठी धरणे आहेत. या धरणांचे पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरले जाते. मात्र, या धरणांच्या आजूबाजूच्या शासकीय जागांवर अतिक्रमण करून रिसॉर्ट, हॉटेल आदी बांधकामे करण्यात आली आहेत. यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत जलसंपदा विभागाकडे अनेक तक्रारी येत होत्या, तसेच याबाबत अनेक वेळा विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या अतिक्रमणांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील आठवड्यापासून जलसंपदा विभागाच्या वतीने धरण परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही अतिक्रमणे हटविण्यासाठी पुणे महापालिकेकडून यंत्रसामग्री आणि पोलिसांकडून बंदोबस्त पुरविण्यात आला. दबावाला बळी न पडता कारवाई या कारवाईवेळी अतिक्रमणधारकांनी प्रशासनावर विविध पद्धतीने दबाव आणण्याचा प्रयत्न केला. धमक्या देणे, कारवाईविरोधात न्यायालयात जाणे, असे प्रकारही करण्यात आले. मात्र, प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता ही कारवाई सुरू ठेवली आहे.