Anil Ambani – अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढत असून रिलायन्स ग्रुपवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने रिलायन्स ग्रुपशी संबंधित आणखी १४५२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये पुणे, नवी मुंबई, चेन्नई आणि भुवनेश्वर येथील भूखंड आणि अन्य मालमत्तेचा समावेश आहेत. आतापर्यंत ईडीने अनिल अंबानी यांची एकूण ९००० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. आरएचएफएल आणि आरसीएफएलद्वारे जमा करण्यात आलेली सार्वजनिक रक्कम अनिल अंबानींशी संबंधित संस्थांमध्ये वर्ग करत मनी लाँड्रिंग केल्याच्या आरोपाने अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने नव्या आदेशान्वये अनिल अंबानी ग्रुप ऑफ कंपनीजशी संबंधित १४५२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वी ७५०० कोटींची संपत्ती जप्त केली होती. या प्रकरणात ईडीने ऑगस्टमध्ये अंबानी यांची चौकशी केली होती. तसेच त्यांना परकीय चलन उल्लंघन प्रकरणात समन्स बजावले होते. दरम्यान, आरकॉम ही अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाची दूरसंचार कंपनी होती, जी मोबाइल फोन सेवा, इंटरनेट, ब्रॉडबँड आणि एंटरप्राइज कम्युनिकेशनसारख्या सुविधा पुरवत होती. एकेकाळी आरकॉमची गणना देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये होत होती. मात्र, कर्ज वाढल्याने आणि व्यवसाय डबघाईला आल्याने कंपनी हळूहळू बंद झाली. त्यानंतर अनेक बँकांनी तिचे कर्ज फसवणूक म्हणून घोषित केले आणि हे प्रकरण ईडी व सीबीआयपर्यंत पोहोचले. ईडीने ही चौकशी सीबीआयच्या एफआयआरच्या आधारावर सुरू केली होती, ज्यामध्ये आरकॉम, अनिल अंबानी आणि इतरांवर फसवणूक आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.