नागरिकांकडून जीवनदान ः मदतीसाठी धावले प्राणीमित्र पिंपरी – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. पर्यायाने, आता रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. आज तर, चक्क पिंपरीत नागरिकांना मोराचेच दर्शन घडले. घाबरलेल्या स्थितीत असलेल्या या मोराला पाणी व अन्न देऊन नागरिकांनी प्राणीमित्र विनायक बडदे यांच्या हवाली केले. संबंधित मोराला वन विभागाकडे (पुणे) सुपूर्द करण्यात येणार आहे. पिंपरीतील काळेवाडी पुलाजवळ असलेल्या प्रथमेश हाऊस या इमारतीजवळ आज सायंकाळी 5 ते 5.15 च्या सुमारास हा मोर पाहण्यास मिळाला. अरुण वाणी यांनी संबंधित मोर पाहिला. तो घाबरलेल्या अवस्थेत होता. त्यांनी त्याला पाणी, ज्वारी आणि खरबूज खाण्यास दिले. त्यानंतर जुनी सांगवी येथील वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे यांना संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. “लॉकडॉऊन’ असतानाही बडदे सांगवी येथून पिंपरी येथे आले आणि मोराला ताब्याला घेतले. आता त्यांना वन विभागाकडे सुपूर्द केले जाणार आहे. बडदे म्हणाले, “संबंधित मोर घाबरलेल्या स्थितीत होता. तो अन्नाच्या शोधात बहुदा नागरी वस्तीत आला असावा. चतुश्रृंगीच्या मागील बाजूला वन विभागाचे राखीव पट्टे आहेत. तेथे हा मोर सोडण्यात येईल. त्यासाठी त्याला वन विभागाकडे सुपूर्द केले जाणार आहे.’