#MonsoonSession2023 : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार असंवेदनशील – रोहित पवार

मुंबई :- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. पहिल्या अर्ध्या तासातच दिवसभराचं कामकाज गुंडाळलं. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी म्हटलं आहे की,”राज्यातील तब्बल १६ जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे अत्यल्प असून इतकी भीषण परिस्थिती असताना सरकार मात्र केवळ स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतंय.
ते पुढे म्हणाले की, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून शेतकऱ्यांचे प्रश्न, पाऊस या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली असताना ती फेटाळून उलट पहिल्या अर्ध्या तासातच दिवसभराचं कामकाज गुंडाळलं.. यावरून हे सरकार किती असंवेदनशील आहे हेच स्पष्ट होतं… अशा या असंवेदनशील सरकारचा तीव्र निषेध! असा जोरदार हल्लाबोल त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.




