Monsoon Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज
Monsoon Update :

Monsoon Update : नैऋत्य माॅन्सूनने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा प्रगती करत लक्षद्वीपपर्यंत मजल मारली असून पुढील काही दिवस माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. राज्यातील विविध भागांत पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून विदर्भात काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, माॅन्सूनने बुधवारी नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्राचा काही भाग व्यापला. तसेच लक्षद्वीपच्या काही भागांपर्यंत माॅन्सून पोहोचला आहे. याशिवाय नैऋत्य व आग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान समुद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील काही भाग माॅन्सूनच्या प्रभावाखाली आले आहेत.
पुढील दोन दिवसांत माॅन्सून नैऋत्य व आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, लक्षद्वीप परिसर, आग्नेय व मध्य-पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हेही वाचा – रेशन वितरणाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, तीन महत्त्वपूर्ण बदल
या भागात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज –
दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जालना, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत पुढील दोन दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पुढील चार दिवस, तर सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज आहे. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे, सातारा, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
विदर्भात उष्णता कायम –
दुसरीकडे, विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम आहे. अकोला, अमरावती, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यांना पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यांसाठी अतिउष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी आणि रविवारी विदर्भातही पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.





