Monsoon Shopping : बाजारपेठेत छत्र्या, रेनकोट दाखल! पण ‘या’ कारणामुळे ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री
Monsoon Shopping : १५ जूनपासून शाळा सुरू होत असल्याने पालकांची शालेय साहित्यासह रेनकोट खरेदीसाठी लगबग; बाजारपेठेत विविध प्रकारच्या छत्र्या दाखल.

Monsoon Shopping – पावसाळ्याच्या तोंडावर सातार्यातील बाजारपेठेत रेनकोट, छत्र्या, जॅकेट विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रेनकोट, छत्र्या आणि पावसाळी टोप्या खरेदीसाठी दुकाने आणि स्टॉलवर नागरिकांची गर्दी होत आहे. पावसाळी साहित्याचे दर गतवर्षाच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. 300 ते 400 रुपयात मिळणार्या रेनकोटच्या किमती 500 ते 700 रुपयांपर्यंत, तर 100 रुपयांपर्यंत मिळणार्या छत्र्यांच्या किमती 150 ते 200 रुपये झाल्या आहेत.
पावसाळी टोप्या 50 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आला असताना, शहरातील मोती चौक, खण आळी, राजपथ, पोवई नाका यासह विविध ठिकाणच्या दुकानांमध्ये पावसाळी साहित्य दाखल झाले आहे. 15 जूनपासून शाळा सुरू होणार असल्याने, पालक विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्यासोबतच रेनकोट, छत्र्या, जॅकेट खरेदी करत आहेत. मोठ्या छत्र्या 150 ते 200 रुपये, लहान छत्र्या 100 ते 120 रुपये,
साधे रेनकोट 400 ते 400 रुपये, पारदर्शक रेनकोट 500 ते 700 रुपये, चेन असलेले रेनकोट 500 ते 750 रुपये, लाँग रेनकोट 600 ते 800 रुपये, असे दर आहेत. पुरुषांसाठी असलेल्या पावसाळी पँट-शर्ट, पॅराशूट नायलॉन, ट्रान्सपरंट रेनकोटच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. अनेक जण पावसाळी साहित्य ऑनलाइन खरेदी करत आहेत. त्यात खास सवलत मिळत असल्याने फायदा घेतला जात आहे.





