मुंबई : काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विमान वाहतूक क्षेत्रातील वाढत्या मक्तेदारीमुळे अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि यामुळे प्रवाशांच्या हितावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. निष्पक्ष स्पर्धा होण्यासाठी संकटग्रस्त इंडिगोचे दोन कंपन्यांमध्ये विभाजन करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. भारतातील हवाई प्रवासात आता फक्त दोन प्रमुख कपन्यांचे वर्चस्व आहे. या क्षेत्रात ६५ टक्के इंडिगो आणि जवळजवळ ३० टक्के वाटा असलेले टाटा ग्रुप (एअर इंडिया आणि एआय एक्सप्रेस)चा वाटा आहे . २००४ मध्ये भारतात १० कार्यरत विमान कंपन्या होत्या, परंतु आज फक्त दोन मोठ्या कंपन्या उरल्या आहेत. जवळजवळ ४० कोटी प्रवासी आणि फक्त दोन विमान कंपन्या, ही परिस्थिती भविष्यात अधिक गंभीर होईल, असा इशारा त्यांनी दिला. मोठ्या प्रमाणात विमान वाहतूक विस्कळीत झालेल्या इंडिगोमधील सध्याच्या संकटाला दुर्दैवी आणि धक्कादायक म्हणत, ही परिस्थिती नियामक त्रुटी आणि सरकार आणि खाजगी विमान कंपन्यांमधील कथित संगनमताचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले. चव्हाण यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा, इंडिगोचे सीईओ यांचे निलंबन आणि या त्रुटींसाठी जबाबदार नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांची बडतर्फी करण्याची मागणी केली. सरकारने संपूर्ण क्षेत्र खाजगी कंपन्यांच्या नियंत्रणाखाली येऊ देऊ नये. निष्पक्ष स्पर्धा होण्यासाठी इंडिगोचे दोन कंपन्यांमध्ये विभाजन केले पाहिजे. सरकारने स्वतःची राष्ट्रीय विमान कंपनी सुरू करावी, असे त्यांनी सुचवले.