Monika Rajale : जायकवाडीच्या पाण्याखाली जाणाऱ्या शेतजमिनींचे तातडीने सर्वेक्षण करून न्याय द्यावा; आ. मोनिका राजळे यांची सरकारकडे मागणी
जायकवाडी प्रकल्पासाठी त्याग केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन बाधितांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आ. राजळे (Monika Rajale) यांनी केली.

Monika Rajale : विकासाचा पाया ठरलेल्या जायकवाडी धरण प्रकल्पासाठी शेवगाव तालुक्यातील तब्बल २२ गावांनी आपल्या जमिनी, घरे आणि गावांचा त्याग केला. मात्र, आजही भूसंपादन न झालेल्या अनेक शेतजमिनी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर वारंवार पाण्याखाली जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधत शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय प्रभावीपणे मांडला. यावेळी आ.राजळे यांनी सभागृहात सांगितले की, शेवगाव तालुक्यातील अनेक शेतजमिनी गेल्या चार वर्षांपासून वारंवार पाण्याखाली जात आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत असून अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या प्रश्नाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पाण्याखाली जाणाऱ्या शेतजमिनींचे सर्वेक्षण करावे, अशी त्यांनी मागणी केली.
यासोबतच, बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी किंवा संबंधित जमिनींचे भूसंपादन करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा योग्य मोबदला देण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी विधानसभेत मांडली.
जायकवाडी प्रकल्पासाठी त्याग केलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन बाधितांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी आ. राजळे (Monika Rajale) यांनी केली.






