नवी दिल्ली : आर्थिक गुन्हेगार मोनिका कपूरचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात सीबीआयला यश आले आहे. गेल्या २५ वर्षांपासून ती भारतीय तपास संस्थेला गुंगारा देत होती. आता तिला भारतीय न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मोनिका कपूरच्या नावे इंटरपोलने रेड क;र्नर नोटीस बजावली होती. अमेरिकेतून सीबीआयने तिला ताब्यात घेतले आहे. तला बरोबर घेऊन सीबीआयचे पथक विमानाने भारताकडे रवाना झाले आहे. बुधवारी रात्री हे पथक भारतात दाखल होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मोनिका ओव्हरसीजची मालकीण कपूर हिने तिचे भाऊ राजन खन्ना आणि राजीव खन्ना यांच्यासोबत कट रचून १९९८ मध्ये बनावट निर्यात कागदपत्रे – शिपिंग बिल, इनव्हॉइस आणि बँक प्रमाणपत्रे तयार केली होती. दागिन्यांच्या उत्पादन आणि निर्यातीसाठी शुल्कमुक्त साहित्य आयातीसाठीचे सहा परवाने मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे तिने केल्याचा आरोप आहे. अहमदाबाद येथील डीप एक्सपोर्ट्सने सदर परवान्यांचा वापर केला आणि शुल्कमुक्त सोने आयात केले ज्यामुळे सरकारी तिजोरीला १.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. तिच्या आणि तिच्या भावांविरुद्ध ३१ मार्च २००४ रोजी गुन्हेगारी कट, फसवणूक आणि बनावटगिरीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले. अमेरिकन अधिकाऱ्यांसोबतच्या सततच्या सहकार्यातून अमेरिकेत अलिकडेच नीरपव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक झाली. त्यानंतर अलिकडच्या काळात सीबीआयला मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. हे प्रत्यार्पण न्यायासाठी पाठपुरावा करण्याच्या प्रयत्नांचे एक मोठे यश आहे आणि आंतरराष्ट्रीय सीमांची पर्वा न करता फरार आरोपींना भारतात कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी सीबीआयची कटिबद्धताच यातून दिसून येते, असे सीबीआयच्या प्रवक्त्यांनी निवेदनात म्हटले आहे. सीबीआयने अलिकडच्या वर्षांत परस्पर कायदेशीर सहाय्य किंवा इंटरपोल समन्वयाद्वारे एकूण १०० हून अधिक फरार आरोपींना परत आणले आहे. त्यामुळे सीमापार अंमलबजावणीमध्ये एक प्रकारचा विक्रम प्रस्थापित झाला आहे.