प्राप्तिकर विभागाची तपासणी, धाडीची यंत्रणा सज्ज
पुणे -विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशांचा वापर कमी व्हावा याकरिता प्राप्तिकर विभागाचा चौकशी विभाग सक्रिय राहणार आहे. या काळात नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काळा पैसा कोणाकडे आहे? याकडे लक्ष दिले जाणार आहे.
याकरिता पुणे आणि नागपूर विभागांमध्ये 34 शीघ्र कृती दले तयार केली आहेत. त्याचबरोबर 13 ठिकाणच्या विमानतळावरही सुसज्ज यंत्रणा उभारली आहे. ही माहिती प्राप्तिकर अन्वेषण विभागाचे महासंचालक एम. के. दुबे आणि चौकशी विभागाचे मुख्य संचालक जयराज कजाला यांनी दिली. यावेळी प्राप्तिकर चौकशी विभागातील अतिरिक्त संचालक संदीपकुमार साळुंखे उपस्थित होते.
दुबे म्हणाले, निवडणुकांत काळ्या पैशांच्या वापरावर प्रतिबंध करण्यासाठी निवडणूक आयोग आयकर विभागाच्या चौकशी संचालनालयाच्या सुविधांचा वापर करणार आहे. यासंदर्भात प्राप्तिकर महासंचालक पुणे यांचे कार्यालय रोख व इतर मौल्यवान वस्तूंच्या देवाणघेवाणीवर राज्य व इतर केंद्रीय विभागाच्या समन्वयाने तसेच स्वतःच्या अधिकारांमध्ये बारीक लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी पुढे येऊन काळापैसा, सोने, चांदीची साठवणूक, वापर यांची माहिती विभागाने जारी केलेल्या शुल्क मुक्त क्रमांकावर, मोबाइल क्रमांकावर किंवा व्हॉट्स ऍपवर शक्यतो पुराव्यासह देण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने नागरिकांना केले आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे बॅंकांतील संशयास्पद व्यवहारांची माहिती असते. त्या आधारावही कारवाई केली जाते.
विभाग या माहितीची शहानिशा करून पुढील कारवाई करणार आहे. यासंबंधातील पुढील माहिती निवडणूक आयोगाला दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात यासाठी मुंबई, पुणे आणि नागपूर असे 3 विभाग आहेत. त्याचबरोबर प्राप्तिकर विभाग या काळात सक्रिय राहणार असून स्वतः रोख पैशांचा अयोग्य वापर केला जात असेल तर त्याकडे लक्ष देणार आहे. यासाठी प्राप्तिकर विभागाने 500 कर्मचारी कार्यरत ठेवले आहेत. या काळात नागरिकांनी रोख रकमेचा वापर किंवा वाहतूक केल्यास या पैशांच्या स्त्रोतांची माहिती जवळ बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.
या अगोदरच्या निवडणुकांमध्ये प्राप्तिकर विभागाने किती धाडी टाकल्या आणि किती नागरिकांनी माहिती दिली, असे विचारले असता ते म्हणाले, 2019 मधील लोकसभा निवडणुकावेळी प्राप्तिकर विभागाकडे 476 नागरिकांनी फोन करून माहिती दिली. मात्र, त्यातील 24 फोन कॉलमध्ये तथ्य आढळले आणि त्यावर कारवाई करून त्या संबंधातील माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. नागरिक माहिती देताना आपले नाव अनामिक ठेवू शकतात, मात्र त्यांनी पुरावा दिल्यास प्राप्तिकर विभागाला काम करणे सोपे जाते, असे त्यांनी सांगितले.
माहिती देण्यासाठी शुल्क मुक्त क्रमांक
24 तास चालणाऱ्या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून पुणे विभागातील माहिती देण्यासाठी 1800-233-0700 आणि 1800-233-0701 हे क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत. 7498977898 या व्हॉट्सऍप क्रमांकावर आणि 020-24268825 या फॅक्स क्रमांकावर ही माहिती दिली जाऊ शकते. नागपूरसाठीचा शुल्क मुक्त क्रमांक 1800-233-3785 आहे. नागपूरसाठी व्हॉट्स ऍप क्रमांक 9403391664 आणि फॅक्स क्रमांक 0712-2525844 असा आहे.