जहांगिरपुरीतील आरोपींच्याविरोधात मनी लॉन्डरिंगचे प्रकरण दाखल

नवी दिल्ली – दिल्लातील जहांगिरपुरी हिंसाचार प्रकरणातील विविध संशयितांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने मनी लॉन्डरिंग विरोधी प्रकरण दाखल केले आहे. या हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी मोहंम्मद अन्सार याच्याविरोधातही हे प्रकरण दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात “ईडी’ने पोलिसांच्या “एफआयआर’शी समतुल्य असलेली “ईसीआयआर’ दाखल करून घेतली आहे.
या संदर्भात दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी अलिकडेच ईडीला पत्र लिहून मनी लॉन्डरिंग प्रकरणाचा तपास करण्याची शिफारस केली होते. पोलीसंनी प्राथमिक तपास केला असून या संदर्भातील प्राथमिक माहिती अहवालदेखील सादर करण्यात आला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या या कतक्रारींच्या आधारेच ईडीचे प्रकरण आधारलेले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ईशान्य दिल्लीतील जहांगिरपुरीत दिनांक 16 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांदरम्यान संघर्ष झाला होता. त्यात 8 पोलीस आणि एक स्थानिक जखमी झाले होते. यावेळी दगडफेक आणि काही वाहनांची जाळपोळही झाली होती. या प्रकरणी आतापर्यंत 25 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त 2 अल्पवयीनांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पाच आरोपींच्याविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे.





