- प्रादेशिक संचालकांची बैठक
- बाह्यस्त्रोत कर्मचारी नातेवाइकांच्या नावावर भरताहेत निविदा
पिंपरी – गेली दहा-पंधरा वर्षांपासून महावितरणच्या कार्यालयांमध्ये ठाण मांडून बसलेल्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त लागला आहे. प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.16) झालेल्या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
पिंपरी-चिचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या मागणीनंतर महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयात बुधवारी (दि.16) बैठक पार पडली. या बैठकीला गणेशखिंड परिमंडल अधीक्षक अभियंता पंकज तगतपल्लीवार, पिंपरीचे कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिक असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश बक्षी, कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, उपाध्यक्ष मनोज हरपळे, जावेद मुजावर, सचिव नितीन बोंडे, सुनील पवार, संजीव पाटील, नटराज बोबडे, महेश माने, सूरज भराटे, मनोज सचवानी, मनेश शेळके, विजय पाटील, विनोद पटेल आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांचे नातेवाईक ठेकेदार
पिंपरी-चिंचवड शहरात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील महवितरणच्या कार्यालयांमध्ये सुमारे 100 बाह्यस्त्रोत कर्मचारी कार्यरत आहेत.गेली दहा- पंधरा वर्षांत अनेकदा बदल्या होऊनही महावितरणच्या एकाच कार्यालयात हे कर्मचारी ठाण मांडून आहेत. त्यामुळे त्यांचे अधिकाऱ्यांशी हितसंबंध तयार झाल्याने, हे कर्मचारी आपल्या नातेवाइकांच्या नावावर महावितरणच्या कामाच्या निविदा भरत असल्याचे पुरावेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाळे यांना सादर केले. तसेच मोशी शाखा कार्यालय व निगडी प्राधिकरणातील महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाचीन गंभीर दखल घेऊन, त्यावर तत्काळ कारवाई करण्याचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत आग्रही मागणी केली. याची गंभीर दखल घेत यावर तत्काळ कार्यवाहीच्या त्यांनी सूचना दिल्या.
मीटरचा तुटवडा
शहरात सोसायट्यांना वीजपुरवठा करताना संबंधित सोसायट्यांशी 99 वर्षांचा करार करणे बंधनकारक असतानादेखील ही प्रक्रिया रेंगाळली आहे. तसेच वीजमीटर अभावी शहरातील नव्या ग्राहकांना नव्याने वीजजोड देण्यास अडचणी येत आहेत. महावितरण कार्यालयातील आवक-जावक विभागाकडून विलंबाने होणाऱ्या या प्रक्रियेला गती देण्याची मागणी संघटनेने केली. तर महावितरणच्या विविध शाखा कार्यालयांमध्ये वीजजोड घेण्यासाठी वेगवेगळे नियम असल्याने, त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे वीजजोड घेण्यासाठी सर्व कार्यालयांमध्ये समान कागदपत्रे असावीत, अशी मागणी केली.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वीज जोडसाठी कागदपत्रे सादर केली असता, शाखा कार्यालयातून अडवणूक केली जात असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच महावितरणकडून पुरेशा प्रमाणात वीज मीटर उपलब्ध करु दिले जात नसल्याने शहरातील शेकडो वीजजोड रखडले असल्याची बाब नाळे यांच्या निदर्शनास आणून दिली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर वीज मीटरचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यालयाशी संपर्क करु.