मोहरमच्या मिरवणुकीला परवानगी नाहीच

नवी दिल्ली – मोहरमच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्व देशभरासाठी सर्वसाधारणपणे लागू असतील. पण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या लखनौमधील याचिकाकर्त्याने या संदर्भातील मागणी करणारी याचिका अलाहबाद उच्च न्यायालयात दाखल करावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली.
जर मोहरमच्या मिरवणुकीला परवानगी दिली तर कोविडची साथ पसरवल्याबद्दल एकाच समुदायाला लक्ष्य केले जाईल आणि अनागोंदी सारखी परिस्थिती निर्माण होईल, असे सरन्यायाधीश एस.ए.बोबडे आणि न्या. ए.एस.बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांनी सांगितले.
सर्व लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण व्हावा, असे आपल्याला वाटत नाही, त्यामुळे याचिकाकर्त्यांनी आपली याचिका मागे घ्यावी आणि लखनौमध्ये मिरवणूक काढण्यासाठी संबंधित उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी सूचना न्यायालयाने केली.





