बगदाद : इराकचे अध्यक्ष बरहामसालेह ह्यांनी मोहम्मद तौफिक अलावी यांची इराकचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. बरहाम सालेह यांनी आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असल्याचे इराकचे माजी संवाद मंत्री असलेल्या मोहम्मद तौफिक यांनी सांगितले.
यामुळे इराकमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेला राजकीय पेच सुटला आहे. दरम्यान इराकमध्ये गेल्या चार महिन्यांपासून आणि माजी पंतप्रधान आदेल अब्दुल माहदी यांनी राजीनामा दिल्यानंतरही दोन महिन्यांपासून नागरिकांनी सरकारविरोधात सुरू केलेले आंदोलन सुरूच आहे.
राजकीयदृष्ट्या स्वतंत्र पंतप्रधान, भ्रष्टाचार आणि आंदोलनाशी संबंधित हिंसाचाराच्या उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या सरकारविरोधी आंदोलनाच्या चार महिन्यांत प्रामुख्याने बगदाद आणि परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.