१) 20 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या राज्यातील साधारण 20 जिल्ह्यातील काही नगरपालिकांच्या प्रभागात निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, पुणे, सोलापूर, चंद्रपूर, यवतमाळ, अहिल्यानगर, धाराशिव, नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतांच्या निवडणुका संपन्न होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आता काही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या काही प्रभागातील निवडणुकांना ब्रेक लागल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. २) पुण्यात तरुणाकडून तरुणीची हत्या पुण्यात एका तरुणाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः देखील टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. हे दोघेही पुण्यातील ससून रुग्णालयात काम करायचे. प्रेम संबंधातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गणेश काळे (वय २१, रा. बीड) आणि दिव्या निगोश (वय २०, रा. येरवडा) असे मृतदेह आढलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिव्या ही मूळची पुण्यातील विमानतळ भागात वास्तव्यास असून तिचे वडील पोलिस कर्मचारी आहेत. तर गणेश हा मूळचा बीडचा आहे. ३) कमळाचं बटन दाबा, खडसेंच्या चूक लक्षात येताच सुधारली “भाजपला मतदान करा”, असे थेट आवाहनच एकनाथ खडसेंनी जाहीर सभेतेून केले. त्यानंतर क्षणभर गोंधळ उडाला होता. अखेर कार्यकर्त्यांनी आठवण करून दिल्यानंतर खडसे यांनी चूक दुरुस्त करत “तुतारीलाच मतदान करा” असं सांगितले. भुसावळमधील निवडणुकीच्या प्राचारार्थ आयोजित सभेतून एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, गेल्या अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीत काम केल्याने एकनाथ खडसे यांनी सभेतून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात अजून भाजपा गेली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ४) राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उद्या म्हणजेच १ डिसेंबरपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना हे तीन दिवस मद्य खरेदी करता येणार नाही. निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/ विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती), बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी १, २ डिसेंबर आणि ३ डिसेंबर २०२५ रोजी या तीन दिवशी बंद राहतील. या दिवशी मद्य विक्री बंदी करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर काही जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी (३ डिसेंबर) सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री बंद राहिल. त्यानंतर मात्र काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्री सुरू होणार आहे. तर ज्या ठिकाणी निवडणुका रद्द झाल्या आहेत, त्या ठिकाणी मद्यविक्री चालू असणार आहे. ५) अन्नधान्य क्षेत्रात ऐतिहासिक विक्रम नोव्हेंबर महिना भारतासाठी अनेक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कामगिरीने भरलेला होता” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आज “मन की बात” या कार्यक्रमाच्या १२८ व्या भागात त्यांनी देशाला संबोधित केले. “हैदराबादमध्ये जगातील सर्वात मोठ्या LEAP इंजिन MRO सुविधेचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे भारताला जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात एक नवीन पाय रोवता येईल. तसेच भारताने ३५७ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. भारताचे अन्नधान्य उत्पादन १० वर्षांपूर्वीच्या तुलनेत १०० दशलक्ष टनांनी वाढले आहे. अन्नधान्य क्षेत्रातील ऐतिहासिक नोंद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ६) १२ राज्यांतील SIR प्रक्रियेसंदर्भात मोठा निर्णय निवडणूक आयोगाने १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेची अंतिम मुदत सात दिवसांनी वाढवली आहे. आयोगाने मागील आदेश रद्द करत एक नवीन वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार, बूथची गणना आणि पुनर्रचना करण्यापासून ते मसुदा यादी प्रकाशित करणे आणि दावा-हरकती प्रक्रियेपर्यंत सर्व प्रक्रिया आता सुधारित तारखांनुसार केल्या जातील.ही मुदतवाढ ज्याठिकाणी SIR प्रक्रिया आधीच सुरू आहे त्या राज्यांसाठी आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे. यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. ७) ट्रकची ८ दुचाकींना धडक; ५ जणांचा मृत्यू- बिहारच्या मोतिहारीमध्ये एका भरधाव ट्रकने आठहून अधिक दुचाकी आणि एक ई-रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक डझनहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. बिहारच्या कोटवा येथील दीपऊ मोड या भागात आज रविवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या दुचाकीस्वारांना भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये ई-रिक्षा, पादचारी यांचाही समावेश आहे. या अपघातानंतर वाहनांच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या. अपघातानंतर लोकांची एकच आरडाओरड झाली. या अपघातात जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ८) दीपिका पादुकोणची बहीण अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्री दीपिका पादुकोणची बहीण अनिशा पदुकोण लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. देओल कुटुंबियांसोबत अनीशा हिचं नाव जोडलं जात असून तिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अनिशा पादुकोण चं लग्न देओल कुटुंबाचं कनेक्शन असलेल्या रोहन आचार्यशी होणार आहे. रोहन हा प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांचा पणतू आहे. बिमल यांची नात चिमू आचार्य ही रोहन आणि दृषा आचार्यची आई आहे. रोहन आचार्यची बहीण दृषा आचार्य हिचं लग्न सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलशी झालं आहे. अनिशा ही लग्नानंतर दृषाची वहिनी होणार असल्याने देओल कुटूंबाचे कनेक्शन समोर येत आहे. ९) विराट कोहलीचा विश्वविक्रम टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 52 वे ऐतिहासिक शतक झळकावले. 102 चेंडूंमध्ये त्याने ही शतकी खेळी साकारली. या 52 व्या शतकासोबत, कोहली आता एका आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने महान सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. याचबरोबर, कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक 6 वनडे शतके ठोकणारा भारतीय खेळाडू होण्याचा पराक्रम केला आहे. खराब फॉर्मनंतर कोहलीचे पुनरागमन टीम इंडियासाठी मोठे मनोबल वाढवणारे आहे, खासकरून मालिका विजयाच्या दृष्टीने. १०) रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या वनडे सामन्यात स्टार सलामीवीर रोहित शर्माने इतिहास रचला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितने 277 सामन्यांमध्ये आपला 352 वा षटकार मारून पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा 351 षटकाराचा जवळपास 10 वर्षांचा विक्रम मोडला. तो आता वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्यात रोहितने 43 चेंडूत अर्धशतक झळकावले. तसेच, त्याने एका संघासाठी सर्वाधिक षटकार 352 मारण्याचा विक्रमही भारताच्या नावे केला. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे टीम इंडियाला बळ मिळाले आहे.