कल्याण : भारत जोडो यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महागडा टी-शर्ट परिधान करुन पदयात्रेत सहभाग दाखवल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांना यांच्यावर टीका केली होती.त्यानंतर संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या मुलाचा महागडा टी शर्ट घातलेला फोटो कल्याण शहरातील विविध फलकावर झळकवून भाजपच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर रविवार पासून तीन दिवसांच्या डोंबिवली, कल्याणच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मंत्री ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका केल्याने काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकूर यांच्या मुलाचे महागडे टी-शर्ट घातलेले फलक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० लाखाचा सूट घातलेल्या गणवेशाचा फोटो कल्याण शहराच्या विविध भागातील फलकावर झळकवून भाजपच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
कल्याण शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष सचिन पोटे, महिला ब्लाॅक अध्यक्षा विमल ठक्कर यांनी हे फलक लावले आहेत. केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या या फलकावर काँग्रेसच्या अन्य मोठ्या पदाधिकाऱ्याचे नाव नाही. त्यामुळे हात राखून ही टीका केली आहे का, असा प्रश्न भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
या फलकामध्ये काँग्रसने अनुराग ठाकूर यांच्या मुलाने महागडे विदेशी बनावटीचे टी शर्ट घातले असल्याचे दाखविले आहे. तसेच, ‘आपले ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पाहायचे वाकून’ अशी कोपरखळी मारणारे शब्दप्रयोग करुन केंद्र सरकारचा निषेध केला आहे. भारत जोडो यात्रेत टुकडे टुकडे गँगचा सहभाग, भारत तोडणारे भारत जोडो यात्रा काढत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी रविवारी डोंबिवलीत केल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप, केंद्र सरकारच्या भूमिकांचा निषेध केला आहे.