देश पुलवामा हल्ल्यात दुःखी असताना, मोदींनी ६ विमानतळांचे कॉन्ट्रॅक्ट अदानी यांना दिले – राहुल गांधी

चंद्रपूर – नरेंद्र मोदी हे फक्त आपल्या उद्योगपती मित्रांनाच मदत करतात आणि त्यामुळेच सर्व देश पुलवामाच्या दहशतवादी घटनेनंतर दुःखी असताना, मोदींनी अलगद देशातील ६ विमानतळांचे कॉन्ट्रॅक्ट अदानी यांना दिल्याचा आरोप कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. चंद्रपूर येथील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधींनी मोदी हे श्रीमंत उद्योगपतींचे चौकीदार आहेत, गरीबांचे नाहीत असे म्हंटले आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसल्याचा खोटा दिखावा मोदी सरकार करत असून, राफेल विमानाच्या करारात ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना देणार आहे. त्यामुळे मोदी सरकारने गरिबांची फसवणूक केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच सध्या भारतीय जनता पक्ष आपल्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे.

मोदी सरकारने प्रत्येकाला १५ लाख रुपये देण्याचे खोटे आश्वासन दिले पण, काँग्रेसने जे शक्य आहे तेच आश्वासन दिले. जगातील अनेक अर्थतज्ञांकडून ‘न्याय’ योजनेसंबधी माहिती घेतली असून ही योजना संभव असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. त्यामुळे काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही ७२ हजार रुपये देणार असून, याचा थेट फायदा २० कोटी गरिबांना होणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.