नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन आपल्या नवीन कारकिर्दीविषयी त्यांच्याकडून आर्शिवाद घेतले. प्रणवदांबरोबरील भेट ही नेहमीच अनुभव समृद्ध करणारी असते. त्यांचे ज्ञान आणि दृष्टी असामान्य आहे. ते उत्तम राजनीतीज्ञ आहेत. त्यांनी भारताच्या विकासात मोठे योगदान दिले आहे असे मोदींनी त्यांच्या बाबतीत आपल्या ट्विटर संदेशात नमूद केले आहे.
आजच्या भेटीचे छायाचित्रही मोदींनी आपल्या ट्विटर संदेशात जोडले आहे. या भेटीच्यावेळी आपण त्यांच्याकडून आर्शिवाद घेतले असेही मोदींनी नमूद केले आहे. मोदी सरकारने मुखर्जी यांचा गेल्या जानेवारी महिन्यात भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावरही मुखर्जी काहीं दिवसांपुर्वी उपस्थित राहिले होते.