नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी आर्थिक, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्यातील विकासाचा आढावा घेतला आणि त्याचे सकारात्मक मूल्यांकन केले. होरायझन २०४७ पथदर्थक, हिंद-प्रशांत पथदर्शक आणि संरक्षण औद्योगिक पथदर्शकाच्या अनुषंगाने भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची पुष्टीही नेत्यांनी केली. युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी अलिकडच्या काळात झालेल्या प्रयत्नांवर त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली. पंतप्रधान मोदींनी संघर्षाचे शांततापूर्ण निराकरण तसेच शांतता आणि स्थैर्य लवकर पुनर्संचयित करण्यासाठी भारताच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. फेब्रुवारी २०२६ मध्ये भारताने आयोजित केलेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अध्यक्ष मॅक्रॉ यांचे आभार मानले आणि त्यांचे भारतात स्वागत करण्यास आपण उत्सुक असल्याचे सांगितले. दोन्ही नेत्यांनी जागतिक शांतता आणि स्थैर्य वाढविण्यासाठी संपर्कात राहण्याचे आणि निकटतेने काम करण्याचे मान्य केले.