मोदींनी मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करावी – खर्गे यांची मागणी

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोदींना मणिपुरच्या हिंसाचाराबद्दल खरोखरच काही चिंता असेल तर त्यांनी सर्वात प्रथम त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची तातडीने हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. मणिपूरची परिस्थिती हाताळण्यात भाजप सरकार अपप्रचार करू शकत नाही, असे खर्गे म्हणाले.
ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मणिपूरच्या परिस्थितीबाबत मोदींशी बोलले असल्याचे सांगितले जात आहे, पण गेल्या 55 दिवसांपासून मोदी मणिपूरवर एक शब्दही बोलले नाहीत. प्रत्येक भारतीय त्यांच्या बोलण्याची वाट पाहत आहे.जर मोदीजींना मणिपूरची खरोखरच काळजी असेल, तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या मुख्यमंत्र्याला हटवायला हवे,” असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.हजारो लोक जखमी झाले असून मोठ्या प्रमाणावर लोक विस्थापितही झाले आहेत.खर्गे पुढे म्हणाले, भाजप आणि मोदी सरकार मणिपूर हिंसाचार हाताळण्यात त्यांचे अपयश लपवू शकत नाही.सरकारने अतिरेकी संघटना आणि असामाजिक घटकांनी चोरलेली शस्त्रे त्वरीत जप्त करण्याची मागणीही कॉंग्रेस प्रमुखांनी केली.
सुरक्षा दलांच्या मदतीने नाकाबंदी उठवा, राष्ट्रीय महामार्ग खुला आणि सुरक्षित ठेवून जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करा अशी मागणीही त्यांनी केली. पीडित लोकांसाठी मदत, पुनर्वसन आणि उदरनिर्वाहाचे पॅकेज त्वरीत जाहीर करण्याची मागणीही त्यांनी केली.





