तमिळी जनतेच्या मनातील धास्ती मोदींनी दूर करावी; स्टॅलिन यांचे आवाहन

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तमिळनाडूचा दौरा केला. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यापासून मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन दूर राहिले. मात्र, त्यांनी प्रस्तावित लोकसभा मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावरून मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. तमिळी जनतेच्या मनातील धास्ती मोदींनी दूर करावी, असे उपरोधिक आवाहन त्यांनी केले.
तमिळनाडूत एका ठिकाणी विविध प्रकल्पांचे उद्धाटन केल्यानंतर झालेल्या सभेत स्टॅलिन बोलत होते. तमिळनाडूच्या अधिकारांवर गदा येणार नाही याच्या निश्चितीसाठी मोदींनी संसदेत ठराव मंजूर करावा. फेररचनेविषयी वाटणाऱ्या चिंतांचे निवेदन सादर करण्यासाठी मी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. फेररचनेमुळे तमिळनाडूतील लोकसभेच्या जागा घटू शकतात. ती बाब आमच्या भवितव्याच्या दृष्टीने चिंतेची आहे.
फेररचनेच्या माध्यमातून आमचा संसदेतील आवाज क्षीण करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला. लोकसंख्येच्या आधारे फेररचना होणार असल्याचे बोलले जाते. मात्र, तमिळनाडूसारख्या राज्यांनी प्रभावीपणे लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. त्याची शिक्षा आम्हाला मिळू नये. तसे घडणार नाही याची स्पष्ट गॅरंटी मोदींनी जाहीरपणे द्यावी, असे स्टॅलिन म्हणाले. आमच्या पक्षाच्या (द्रमुक) खासदारांनी संसदेत याआधीच फेररचनेविषयी चिंता व्यक्त केली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.





