पूर्णिया : मतचोरीविषयीचे सत्य मी जनतेसमोर उघड केले. त्याविषयीच्या आरोपांवर निवडणूक आयोगाप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कुठलेही उत्तर नाही. मात्र, त्यांना कुठेही गेले तरी मतचोरीसाठी जबाबदार धरले जाईल, असा शाब्दिक हल्ला कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. बिहारमधील प्रचारसभांत बोलताना राहुल यांनी कथित मतचोरीचा मुद्दा लावून धरला. मागील वर्षीच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली. ती मी नुकतीच चव्हाट्यावर आणली. पण, मी खोटे बोलत आहे असे म्हणण्याचे धाडस अद्याप मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दाखवलेले नाही. बिहारमध्ये विरोधकांच्या महाआघाडीसाठी पूर्णपणे अनुकूल वातावरण आहे. मतदारांनी मतचोरी रोखल्यास महाआघाडी पुढील सरकार स्थापन करेल याची १०० टक्के खात्री वाटते, असे ते म्हणाले. मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या आर्थिक धोरणांवरही राहुल यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. बिहारची जनता उपजीविकेसाठी इतर राज्यांत जाते. कठोर मेहनत करण्याची क्षमता असणाऱ्या जनतेला बिहारमध्येच काम का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला. बिहारमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होणार नाही. तसेच, नितीश यापुढे कधीच राज्य सरकारचे नेतृत्व करू शकणार नाहीत, असे भाकितही त्यांनी वर्तवले.