नवी दिल्ली – करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देश लॉकडाऊनची पद्धत अवलंबत आहेत. भारतीय जनताही जवळपास गेल्या एका महिन्यापासून आपापल्या घरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिल्लीबाहेर जाऊ शकलेले नाहीत. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्याहून परतून 5 महिने 6 दिवस झाले. पंतप्रधान झाल्यापासून सहा वर्षात दुसऱ्यांदाच ते सलग इतके दिवस देशात आहेत.
नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी 2016-17 मध्ये सलग सहा महिने एकही परदेश दौरा केला नव्हता. त्यावेळी मोदी 12 नोव्हेंबर 2016 रोजी जपानहून परत आले होते. त्यानंतर थेट 11 मे 2017 रोजी ते श्रीलंकेला गेले. अर्थात, त्यावेळी देशात विधानसभा निवडणुकांचे वातावरण होते. मार्च 2017 मध्ये उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात निवडणुका होत्या.
नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन जवळपास 5 वर्षे 11 महिन्यांचा कालावधी झाला. 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा, तर 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मोदी 2014 पासून आतापर्यंत 59 वेळा परदेश दौऱ्यावर गेले आहेत. काही वेळा एकाच दौऱ्यात अनेक देश समाविष्ट असल्याने त्यांचा 106 देशांमध्ये प्रवास झाला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी दहापेक्षा जास्त परदेश दौऱ्यांवर जातात.
रद्द झालेले दौरे
13 मार्च 2020 – बेल्जियम – भारत-युरोपीय शिखर परिषद
17 मार्च 2020 – बांगलादेश – बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर्ररहमान यांचा जन्मशताब्दी सोहळा