नवी मुंबई : मुंबई हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळेच २००८ मध्ये दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला करण्यासाठी मुंबईची निवड केली. त्यावेळी जे काँग्रेसचे सरकार होते त्या सरकारने आम्ही सरकार म्हणून कमकुवत आहोत हे दाखवले. दहशतवादापुढे गुडघे टेकले. आता आपल्या सरकारसाठी देश आणि देशवासीय यांच्या सुरक्षेपेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. आजचा भारत हा थेट उत्तर देतो. आजचा भारत घरात घुसून मारतो. जगाने ऑपरेशन सिंदूर दरम्यान हे सर्व पाहिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक बडे नेते, ज्यांनी देशाचं गृहमंत्रिपदही भुषवलं आहे, त्यांनी एका मुलाखतीत एक खुलासा केला. त्यांनी दावा केला की मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आपली सैन्य दलं पाकिस्तानवर हल्ला करायला तयार होती. संपूर्ण देशाचीही भावनाही तीच होती. पण त्या ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या देशाच्या दबावामुळे त्यावेळी काँग्रेस सरकारने भारताच्या सैन्यदलांना पाकिस्तानवर हल्ला करु नका असं सांगितलं होतं. काँग्रेसला हे सांगावं लागेल की तो नेता कोण होता ज्याने दुसऱ्या देशाच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला. तो कोण नेता होता ज्याने मुंबईकर आणि देशवासीयांच्या भावनेशी खेळ केला, देशाला याचं उत्तर हवं आहे. काँग्रेसच्या या कमकुवतपणामुळे दहशतवाद्यांचं बळ वाढलं. ज्याची किंमत देशाला अनेकदा मोजावी लागली, आपले जवान शहीद झाले. असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.