खोटेपणाची कास धरणाऱ्या मोदींना आता गांधींची गरज उरली नाही : सेवाग्रामच्या विश्‍वस्ताची मोदींवर टीका

वर्धा भेटीत सेवाग्रामची भेट टाळली

वर्धा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील आपल्या भेटीत सेवाग्रामला भेट देण्याचे टाळल्याने सेवाग्राम आश्रमाचे विश्‍वस्त अविनाश काकडे यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. गेल्या पाच वर्षात आपण महात्मा गांधींपेक्षाही मोठे झालो आहोत असा त्यांचा समज झाल्याने त्यांना आता गांधींची गरज उरलेली नाही असे त्यांनी म्हटले आहे.

वर्धा येथील मोदींच्या आजच्या भेटीच्यावेळी सेवाग्राम आश्रमाला भेट देण्याचा कार्यक्रम कडक उन्हामुळे टाळण्यात आला आणि केवळ जाहीर सभा घेऊन ते येथून रवाना झाले त्या पार्श्‍वभूमीवर काकडे यांनी ही टीका केली आहे. विचार आणि कृती यातून महात्मा गांधी आणि मोदी हे दोन वेगवेळ्या धृवावर आहेत.

मोदींच्या पाच वर्षांच्या सत्तेच्या काळात केवळ देशात खोटेपणाचाच कारभार झाला. त्यांनी गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाला भेट न देणे म्हणजे गांधीजींच्या सत्याच्या आग्रहाचीच थट्टा आहे अशी टीपण्णीही त्यांनी केली आहे. मोदींवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले आहे की, मोदींनी गांधींनाच आव्हान दिले असून त्यांना बहुधा असे म्हणायचे असावे की तुमसे मै बडा हो गया हुँ. तुम सत्य की क्‍या बात करते थे, मै तो झुट की बात करता हुँ. देखो देश मे कौन बडा है. मै मोदी तुमसे बडा हुँ. तुम्ही सत्य बोलत होतात मी खोटे बोलत राहिलो आता बघा देशात कोण मोठा झाला आहे? असाच मोदींचा सवाल असावा असा टोमणाही काकडे यांनी मारला.

ते म्हणाले की केवळ सत्ता मिळवण्यासाठी मोदींनी सतत खोटेपणाचाच आधार घेतला आहे. महात्मा गांधी यांनी कायम अहिंसेची शिकवण दिली पण मोदींनी मात्र कायम हिंसेवरच विश्‍वास ठेवला असा आरोपही त्यांनी केला. कृती आणि उक्तीच्या बाबतीत मोदी आणि महात्मा गांधी हे उत्तर आणि दक्षिण धृवावर आहेत असे ते म्हणाले. त्यामुळे मोदींनी या आश्रमाला भेट दिली नाही हे एका परिने चांगलेच झाले असेही त्यांनी नमूद केले. सन 2014 साली केवळ सत्ता मिळवण्यासाठी आणि महात्मा गांधी यांच्या करिश्‍याम्याचा वापर करण्यासाठीच मोदींनी त्यावेळी या आश्रमाला भेट दिली होती असे मतही त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की गांधी नेहमी दंगलीसारख्या घटनांची जबाबदारी घेत पण मोदींनी 2002 च्या गुजरात दंगलींची कधीच जबाबदारी घेतली नाही.

गोध्रा दंगलीबद्दल मोदींना सर्वोच्च न्यायालयाने क्‍लीन चीट दिल्यानंतर आपण गांधीवादी आहोत हे तोंडदेखले दाखवण्यासाठीच मोदींनी वर्धा येथील महात्माजींच्या आश्रमाला भेट दिली होती असा आरोपही त्यांनी केला.पण गेल्या पाच वर्षातील वर्तणुकीतून आपण ते मोदी नाहींत असे त्यांनी दाखवून दिले आहे असेही ते म्हणाले. वर्धा येथील आश्रम महात्मा गांधी यांनी 1936 साली स्थापन केला होता व त्यांनी त्याला सेवाग्राम असे नाव दिले होते. हे ठिकाण आज अनेकांसाठी तीर्थक्षेत्र झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.