नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी त्यांच्या विखारी टीकेमुळे सुप्रसिद्ध आहेत. ते टीका करताना कोणतेही हातचे राखून बोलत नाहीत. तसेच स्वत:च्या पक्षाचाही ते आरोप करताना अपवाद करत नाहीत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर ते सातत्याने बाण सोडत असतात.
आता त्यांनी मोदी भक्त म्हणवले जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कट्टर समर्थकांवर हल्लाबोल केला आहे. हे मोदी भक्त अर्धवट शिकलेले आहेत. माझ्या पीएच डीचा मुकाबला करू शकत नाहीत, असे डॉ. स्वामी यांनी म्हटले आहे.
मोदींकडे अंध भक्त असणारे नोकर आहेत. ते पैसे घेऊन माझ्याबद्दल अपशब्द वापरतात. मात्र, माझे ट्विट मी स्वत: करत असतो. असले हे अर्धशिक्षित भक्त माझा सामना करू शकत नाहीत. अर्धवट शिक्षण हीच या मोदी भक्तांची समस्या आहे. ते अगदी मंदबुद्धीसारखे वागत असतात. त्यामुळेच ट्विटरवर त्यांना ब्लॉक केले जाते. हे दयनीय आहे.
माझे 1 कोटी फॉलोअर्स आहेत. यांचे जेमतेम 10 ते 20 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांना ट्विट करायचे पैसे दिले जातात. मोदी आणि माझ्यात हाच फरक आहे की त्यांनी या अंध आणि गंधभक्तांना माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या विरोधात अपशब्द वापरण्यासाठी पैसे देऊन कामाला ठेवले आहे, असे स्वामी यांनी म्हटले आहे.