मोदींनी काढले हिंदु कार्ड; वर्धा येथील सभेत कॉंग्रेस हिंदु विरोधी असल्याचा आरोप

शरद पवारांनी पराभवाच्या भीतीने पळ काढला

वर्धा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीत आता हिंदु कार्ड वापरण्याची भूमिका घेतली असल्याचे येथील जाहीर सभेतून स्पष्ट झाले आहे. त्यांनी कॉंग्रेस हा शांतताप्रेमी हिंदुंच्या विरोधातील पक्ष आहे असे त्यांनी म्हटले आहे. हिंदु दहशतवाद हा शब्द कॉंग्रेसनेच पुढे आणला. कॉंग्रेसने सातत्याने हिंदुंना विरोध केला त्यामुळे हिंदु आपल्या विरोधात आहेत याची जाणीव झाल्यानेच राहुल गांधी हे हिंदुंचे प्राबल्य असलेल्या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास घाबरले आहेत असा दावाही मोदींनी त्यांचे नाव न घेता केला आहे.

कॉंग्रेसने शांतताप्रेमी हिंदुंना दहशतवादी ठरवले. पण हिंदु दहशतवादी आहेत काय? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. हिंदु विरोधी कॉंग्रेसला पराभूत करून त्यांना धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी केले. मोदींनी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस व त्यांचे नेते शरद पवार यांनाही लक्ष्य केले. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसने जवानांच्या शौर्याचा अवमान केला. बालाकोट येथील हवाई हल्ल्यानंतर त्यांनी पाकिस्तानला मदत करणारी विधाने केली असा आरोपही त्यांनी केला.

शरद पवारांविषयी ते म्हणाले की आधी पवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता पण पराभूत होण्याच्या भीतीने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. राष्ट्रवादी क्रॉंगेस पक्षातही पवारांच्या कुटुंबियांचा वाद दिसून येत असून शरद पवारांची आता त्यांच्या पक्षावरील पकड ढिली झाली आहे असा दावाही मोदींनी केला. कॉंग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की कॉंग्रेसने भाजपच्या शौचालय योजनेचीही थट्टा केली. मोदी हे शौचालयाचे चौकीदार आहेत असे म्हटले गेले पण मला या बिरूदाचा अभिमान आहे असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.