रशिया युक्रेन युध्द संपवण्यात मोदी मोठी भूमिका बजावू शकतात; झेलेन्सकी यांचा विश्वास

नवी दिल्ली – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यात पंतप्रधान मोदी मोठी भूमिका बजावू शकतात, असा विश्वास युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी युद्ध थांबवू शकतात यात शंका नाही असे त्यांनी म्हटले आहे.
भारतातील एका प्रख्यात माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींचे कौतुक केले आणि म्हटले की मोदींचे प्रयत्न खरोखर युद्ध थांबवू शकतात. हे युद्ध संपवण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान मोदींना खूप महत्त्व आहे. पंतप्रधान हे जगातील एकमेव राजकारणी आहेत ज्यांनी युद्धादरम्यान रशिया आणि युक्रेनला भेट दिली. काही दिवसांत युक्रेन आणि रशियामध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे.
हिवाळ्यात युद्ध लढणे हे दोन्ही देशांच्या सैनिकांसमोर मोठे आव्हान आहे. राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की युक्रेन आणि युक्रेनियन लोकांसाठी हा तिसरा कठीण हिवाळा आहे. आम्ही आमची ऊर्जा प्रणाली टप्प्याटप्प्याने मजबूत करत आहोत. आम्ही रशियन सैन्याला चोख प्रत्युत्तर देऊ.
अलीकडेच मोदी ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाला गेले होते. भारत आणि रशिया यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासमोर रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख केला.
मोदी म्हणाले की, भारत नेहमीच शांततेचा पुरस्कार करत आला आहे आणि प्रश्न शांततेनेच सोडवले जाऊ शकतात. तथापि, झेलेन्स्की यांनी पीएम मोदींच्या या विधानावर जोरदार टिप्पणी केली होती की, आम्ही शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करण्यास तयार आहोत हे भारताचे विधान पुरेसे नाही. भारताची कृतीही पाहिली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, पीएम मोदी हे एका मोठ्या देशाचे पंतप्रधान आहेत. असा देश फक्त असे म्हणू शकत नाही की आम्हाला युद्ध संपवण्यात रस आहे. पीएम मोदी युद्ध संपवण्यात मोठी भूमिका बजावू शकतात.





