पुणे जिल्हा | शिक्षकांच्या पतसंस्थेचे जिल्ह्यामध्ये आदर्श कामकाज

इंदापूर, (प्रतिनिधी) – इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेने पुणे जिल्ह्यामध्ये आदर्श कामकाज करून वेगळा नावलौकिक कमावला आहे. सर्वांना समान संधी देण्याची भूमिका या संस्थेच्या संचालक मंडळाने घेतले आहे. हे संस्थेचे काम उत्कृष्ट आहे. असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले.
इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी शशिकांत शेंडे तर उपसभापती पदी भाऊसाहेब वनवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी सभापती शशिकांत शेंडे यांचा विशेष सन्मान भरणेवाडी येथे केला. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक सभागृहात निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक सौ. एस. एस. कदम यांच्या निरीक्षणाखाली पार पडली.
सभापती पदासाठी व उपसभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने, बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळाने व सभासदांनी एक मुखाने तज्ञ संचालकपदी प्रकाश तोबरे, दत्तात्रय मदने यांच्या निवडीची घोषणा संस्थेच्या मान्यतेने केली.
यावेळी संस्थेच्या प्रगतीची वाटचाल पुढे अशीच कार्यरत राहील. संस्था व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. सभासदांमध्ये कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. काटकसरीचे धोरण अवलंबिले जाईल. सर्व सभासदांचे शंका समाधान केले जाईल, असे आश्वासन नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांनी दिले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव शेंडे, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब नरूटे, इब्टा संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश शेंडे, कास्ट्राइबचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे, शिक्षक संघाचे (शिवाजीराव पाटील गट) तालुकाध्यक्ष अनिल रुपनवर, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष सतीश शिंदे,
शिक्षक नेते दत्तात्रय तोरसकर, तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी विद्यमान सभापती सतीश दराडे यांनी शशिकांत शेंडे यांच्याकडे संस्थेचा पदभार सुपूर्द केला. यावेळी तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, वरकुटे खुर्द गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे सचिव अंबादास नरूटे यांनी प्रास्ताविक तर संतोष गदादे यांनी सूत्रसंचालन केले.





