खालापूर : चौक फाटा येथे सोमवारी (दि. १४ जुलै) रोजी खालापूर पोलिस ठाण्याच्या वतीने आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रील व रूट मार्च उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलिस निरीक्षक सचिन पवार आणि राखीव पोलिस निरीक्षक विजय बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. मॉकड्रीलमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, तर रूट मार्च कर्जत चौक फाटा – तारापूर – चौक बाजारपेठ – तारापूर चौक या मार्गावरून काढण्यात आला. या उपक्रमात राईट कंट्रोल फोर्सचे ३ प्रशिक्षक, मुख्यालयातील ७२ अंमलदार, आरसीपी वडखळ येथील ३५ जवान आणि खालापूर पोलिस ठाण्यातील ३ अधिकारी सहभागी झाले होते. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. आगामी सण-उत्सव शांततेत आणि सलोख्याने पार पडावेत, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.