मांडवगण फराटा : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठ दिवसांपासून सर्वच प्रमुख मोबाइल कंपन्यांच्या नेटवर्कचा मोठा बोजवारा उडाला आहे. एअरटेल, जिओ आणि बीएसएनएल यांसारख्या कंपन्यांचे नेटवर्क सतत गायब होत असल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बँकिंग व्यवहार, ई-सेवा केंद्रे आणि दूध संस्थांचे कामकाज यामुळे पूर्णपणे कोलमडले असून, रिचार्जचे पैसे भरूनही सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मोबाइल कंपन्या महिना संपताच सेवा खंडित करतात, मात्र तांत्रिक बिघाडामुळे ग्राहकांचा जो वेळ वाया जातो, त्याबद्दल कोणतीही सवलत किंवा मुदतवाढ दिली जात नाही. सरकारी मालकीची बीएसएनएल कंपनी असूनही ग्रामीण भागात टॉवरजवळ उभे राहूनही नेटवर्क मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. १८९७ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) या अनियमिततेकडे गांभीर्याने लक्ष देऊन कंपन्यांवर वचक निर्माण करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जय मल्हार दूध संस्थेचे चेअरमन संतोष फराटे यांनी सांगितले की, ऑनलाइन पद्धतीमुळे दूध बिले वेळेवर देण्यासाठी नेटवर्क आवश्यक असते, मात्र आठ दिवसांपासून नेटवर्क नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. ई-सेवा केंद्र संचालक शुभम काळे यांनीही कर्जमाफी आणि शेतीपूरक योजनांच्या ऑनलाईन प्रक्रियेत नेटवर्क अभावी अडथळे येत असल्याचे नमूद केले. ग्राहकांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या कंपन्यांविरोधात आता आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत. हेही वाचा : Abandoned Vehicles : टोलवाटोलवी : बेवारस वाहने कोण उचलणार?; त्रिमूर्ती चौक ते धनकवडी पोस्ट ऑफिस रस्त्यावरील स्थिती