Mobile Data: आजच्या डिजिटल युगात मोबाईल इंटरनेटशिवाय अनेकांची कामच अडतात. सोशल मीडिया, व्हिडीओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग आणि सतत चालणाऱ्या अॅप्समुळे दररोज मिळणारा 1.5GB किंवा 2GB डेटा काही तासांतच संपतो. त्यामुळे अनेकांना वारंवार अतिरिक्त डेटा रिचार्ज करावा लागतो. मात्र, स्मार्टफोनमधील काही साध्या सेटिंग्स बदलल्या तर डेटा खूप प्रमाणात वाचवता येऊ शकतो आणि इंटरनेट दिवसभर सहज वापरता येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोनमधील ‘डेटा सेवर मोड’ सुरू करणं. आज जवळपास प्रत्येक स्मार्टफोनमध्ये हे फीचर उपलब्ध असतं. डेटा सेवर ऑन केल्यावर बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅप्सचा इंटरनेट वापर कमी होतो. त्यामुळे फक्त गरजेपुरताच डेटा वापरला जातो. हे फीचर सुरू करण्यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘डेटा सेवर’ पर्याय ऑन करावा लागतो. यामुळे अनावश्यक डेटा खर्च थांबतो. (Mobile Data) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अॅप्सचे ऑटो-अपडेट बंद ठेवणे. अनेकदा मोबाईलमध्ये असलेली अॅप्स आपोआप अपडेट होत असतात. विशेषतः गुगल प्ले स्टोअर मधील ऑटो-अपडेट फीचर सुरू असेल, तर मोठ्या प्रमाणात डेटा खर्च होतो. अनेकांना हे लक्षातही येत नाही. त्यामुळे प्ले स्टोअरच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘नेटवर्क प्रेफरन्स’मध्ये ऑटो-अपडेट बंद करणं फायदेशीर ठरतं. आवश्यक असेल तेव्हाच वाय-फायवर अॅप्स अपडेट केल्यास डेटा मोठ्या प्रमाणात वाचतो. Mobile Data तिसरी महत्त्वाची सेटिंग म्हणजे व्हॉट्सअॅप (Whatsapp) मधील ‘ऑटो डाउनलोड’ बंद करणं. दिवसभरात व्हॉट्सअॅपवर अनेक फोटो, व्हिडीओ आणि फाइल्स येत असतात. जर ऑटो डाउनलोड सुरू असेल, तर हे सर्व मीडिया आपोआप डाउनलोड होतं आणि डेटा झपाट्याने संपतो. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या ‘स्टोरेज अँड डेटा’ सेटिंगमध्ये जाऊन ऑटो डाउनलोड बंद करणं आवश्यक आहे. यामुळे फक्त गरजेचे फोटो किंवा व्हिडीओच डाउनलोड करता येतात. (Mobile Data) चौथी आणि अत्यंत उपयुक्त गोष्ट म्हणजे बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या अॅप्सवर नियंत्रण ठेवणं. अनेक अॅप्स आपण वापरत नसतानाही इंटरनेट वापरत राहतात. हे अॅप्स डेटा आणि बॅटरी दोन्ही खर्च करतात. मग तो अँड्रॉइड फोन असो किंवा आयफोन, प्रत्येक डिव्हाइसमध्ये ही समस्या दिसून येते. त्यामुळे फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ज्या अॅप्सची सतत गरज नाही, त्यांचा ‘बॅकग्राउंड डेटा’ बंद करणं खूप उपयोगी ठरतं. या छोट्या बदलांमुळे डेटा वाचण्यासोबतच मोबाईलची बॅटरीही जास्त काळ टिकते. त्यामुळे जर तुमचाही मोबाईल डेटा पटकन संपत असेल, तर या चार सेटिंग्स त्वरित बदलून पाहा. यामुळे अतिरिक्त रिचार्जची गरज कमी होईल आणि इंटरनेट दिवसभर सहज वापरता येईल.