Pandharpur | MNS – मनसेचे नेते दिलीप धोत्रे ईव्हीएमच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहे. दिलीप धोत्रे यांनी एव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली असल्याने मतदान कमी झाले असल्याचा आरोप केला. व्हीव्हीपॅटच्या स्लिपची फेर मोजणी करावी, अशी काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. पण त्यांनी ती फेटाळून लावली. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायलायात दाद मागणार असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचा पंढरपूर मतदारसंघातून पराभव झाला. समाधान औताडे यांनी 1 लाख 22 हजार 595 मतांनी धोत्रे यांना पराभूत केले. दिलीप धोत्रे यांना केवळ 2 हजार 568 मते मिळाली. या मतदारसंघात ईव्हीएमचा 100 टक्के घोटाळा झाला, असा आरोप त्यांनी केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीनचा 100 टक्के घोटाळा झाला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे व्हीव्हीपॅट स्लीपच्या फेरमतमोजणीची मागणी केली होती. परंतु, अधिकाऱ्यांनी ती मागणी फेटाळून लावली. म्हणून आता निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात व्हीव्हीपॅटच्या सर्व स्लीपची मोजणी करण्याची मागणी करणार आहे. कारण या ठिकाणी 100 टक्के ईव्हीएमचा घोटाळा झाल्याची माझी खात्री आहे, असे दिलीप धोत्रे म्हणाले.