Avinash Jadhav : मनसे नेत्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; सामाजिक न्याय विभागातील दोन अधिकाऱ्यांचे थेट नाव घेत केली ‘ही’ मोठी मागणी
Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवत सामाजिक न्याय विभागातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

Avinash Jadhav : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या विश्वासू शेलेदारांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अविनाश जाधव यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, या पत्रात त्यांनी मोठी मागणी केली आहे.
सामाजिक न्याय विभागातील निधी वितरण, टेंडर प्रक्रिया आणि मंत्री कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत गंभीर संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या पत्रात त्यांनी सामाजिक न्याय विभागातील दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी असे म्हटले आहे.
सामाजिक न्याय विभागातील भरत कदम (खाजगी सचिव), सिद्धार्थ भंडारे (ओएसडी) या अधिकाऱ्यांराचे अविनाश जाधव यांनी नाव घेत चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पत्रात विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि वस्तीगृहाशी संबंधित कामांमध्ये ऑनलाईन टेंडर प्रक्रियेच्या नावाखाली आगाऊ रक्कम घेऊन कामांचे वाटप झाल्याच्या तक्रारीही समोर येत असल्याचे म्हटले आहे.
याशिवाय मंत्री कार्यालयाचा वापर करून काही कामे देताना आमदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित व्यक्तींना टक्केवारीची मागणी केली जात असल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. तसेच सामाजिक न्याय विभागात ओएसडी म्हणून काम पाहणारे सिद्धार्थ भंडारे हे कोणत्याही अधिकृत आदेशाविना विभागात कार्यरत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या नियुक्तीची आणि अधिकारांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रातून अविनाश जाधव यांनी केली आहे.
या सर्व प्रकरणांमुळे सामाजिक न्याय विभागातील कारभावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असणारी खडाजंगी आणि त्यांच्यातील मतभेद सतत समोर येत असतात. अशावेळी मनसे नेत्याने थेट समाजिक न्याय विभागाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन अधिकाऱ्यांची नावे घेत चौकशीची मागणी केल्याने याची सर्वत्र चर्चा आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे नेते अविनाश जाधव यांच्या पत्राला काय प्रतिक्रिया देतात आणि त्यांनी नावे घेतलेल्या अधिकाऱ्यांबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





