मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरेंनीदेखील महायुतीच्या उमेदवारांसाठी अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या. यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगलं. भाजपला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून अनेकदा शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेला खोचक टोला लगावण्यात आला होता. त्यानंतर आता मनसेकडून शिवसेना ठाकरे गटाला डिवचण्यात आलं आहे. मनसेनं वरळीच्या उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना डिवचलं आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेकडून वरळीमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मनसेचे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे पोस्टर लावलं आहे. या पोस्टरवरून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने सामने येऊ शकतात. काय लिहिले आहे पोस्टरमध्ये? ‘बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया! जनमनातला आमदार संदीप वरळीत आणूया! वरळीचे भावी आमदार (मनसे नेते) श्री संदीप देशपांडे’ असा मजकूर या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. या पोस्टरची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीमधून निवडणूक लढणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.