Pune District : मनरेगाच्या विहिरीला निकषांची बाधा
Pune District : यंदाही दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांना पाणी कसे द्यायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा नसल्याने प्रत्येक हंगामात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसाठी चार वर्षांपासून पाठपुरावा करूनही सलग ४० आर क्षेत्राचा निकष पूर्ण होत नसल्याचे कारण देत विहिरीचा लाभ मिळू शकत नसल्याची व्यथा तळेगाव ढमढेरे येथील अल्पभूधारक शेतकरी तुकाराम भुजबळ यांनी मांडली आहे.
भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे एकूण एक हेक्टरच्या आसपास जमीन असून, त्यापैकी ३८ आर क्षेत्र सलग आहे. त्याच परिसरातील आणखी दोन गटांमध्ये मिळून ५८ आर क्षेत्र आहे. मात्र, सिंचन विहिरीसाठी सलग ४० आर क्षेत्राची अट पूर्ण होत नसल्याने त्यांचा प्रस्ताव अपात्र ठरविला आहे. जमिनीचे तुकडे हाच शेतकऱ्याचा दोष झाला. मग त्याच कारणामुळे सिंचन सुविधेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी उन्हाळ्यात वेळ नदीला आवर्तन न मिळाल्याने त्यांच्या शेतातील एक एकर ऊस पाण्याअभावी जळून गेल्याचे त्यांनी सांगितले. यंदाही दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांना पाणी कसे द्यायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा नसल्याने प्रत्येक हंगामात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
तळेगाव ढमढेरे परिसरात हरितक्रांतीला बळ देणाऱ्या भीमा नदी आणि वेळ नदीतील पाणीसाठा आटू लागल्याने सिंचनाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. पाण्याची पातळी खालावल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीपंपांचे पाइप नदीपात्रात आणखी पुढे वाढवून पाणी मिळविण्याची धडपड करावी लागत आहे. शेतकऱ्यांची ही धडपड गंभीर जलसंकटाची जाणीव करून देणारी आहे. एका बाजूला नद्यांचे पाणी आटत आहे, तर दुसऱ्या बाजूला सिंचनासाठीच्या शासकीय योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना निकषांच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. हा विरोधाभास दूर करा, अशी मागणी होत आहे.
आमच्या हातात नांगर घेऊन वावर फुलवण्याची जिद्द आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने देण्यापेक्षा प्रत्यक्ष पाण्याचा मार्ग मोकळा करावा. आम्हाला मदतीच्या घोषणा नकोत, तर शेती जगवण्याची संधी हवी. एकदा पाणी द्या, याच ओसाड मातीतून सोनं पिकवून दाखवू; पण शेतकऱ्याच्या घामाची किंमत ओळखून त्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी कोण घेणार.
-तुकाराम भुजबळ, शेतकरी, तळेगाव ढमढेरे.शासन निर्णयातील (GR) निकषांनुसार सिंचन विहिरीसाठी सलग ४० आर क्षेत्र असणे बंधनकारक आहे. संबंधित शेतकऱ्याचे क्षेत्र सलग नसल्याने हा प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आला आहे.
– महेश डोके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरूर.





