१) इंडिगोवर कारवाई होणार? मंत्री मुरलीधर मोहोळांनीची माहिती अहमदाबाद दुर्घटनेनंतर पायलट असोसिएशनने मागणी आमचा ड्युटी टाईम 10 तासांवरून 8 तास करावा, अशी मागणी केली होती. हायकोर्टाने तसे आदेशही दिले होते, डीजीसीएने तशी अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. इंडिगोने मात्र वेळ तशी पाळली नाही, अशी महत्वाची मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. भारत सरकारने या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून इंडिगोच्या प्रमुखांना नोटीस पाठवली आहे. चार सदस्यांच्या चौकशीत माहिती समोर आल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील मोहोळांनी स्पष्ट केले आहे. २) विरोधकांचा चहापानावर बहिष्कार राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते अद्याप नियुक्त न केल्याने विरोधी पक्षांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या पारंपारिक चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना सांगितले की चहापानाचे आमंत्रण आमदारांऐवजी वैयक्तिक आमदारांना पाठवण्यात आले आहे. “दोन्ही सभागृहात कोणतेही आमदार नाहीत आणि पदे रिक्त आहेत. ही दोन्ही संवैधानिक पदे आहेत. दोन्ही पदे रिक्त ठेवून सरकारने हे दाखवून दिले आहे की त्यांचा संविधानावर विश्वास नाही. म्हणून आम्ही चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे,” असे ते म्हणाले. ३) एकनाथ शिदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला तुम्ही म्हणता उपमुख्यमंत्री पद घटना बाह्य आहे. मुख्यमंत्री होतो तेव्हाही घटना बाह्य काही लोकांना एवढी पोटदुखी आहे की, मी मुख्यमंत्री असो वा उपमुख्यमंत्री त्यांची पोटदुखी थांबतच नाही”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोल्ट होते. ते म्हणाले, मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी तिला पकडून ठेवली आणि बाकी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं. आता जनता त्यांना वाऱ्यावर सोडणार आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले. ४) इंडिगो च्या गोंधळामुळे आमदारांना फटका इंडिगो च्या गोंधळामुळे नागपूरला जाणारे अनेक विमाने रद्द झाली आहेत. याचाच थेट फटका राज्यातील आमदारांना सुद्धा बसलाय. नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाला अनेक आमदार हे विमानाचा पर्याय वापरतात. मात्र यंदा इंडिगोमुळे झालेल्या गोंधळामुळे अनेक आमदारांचे विमान प्रवास रद्द झाले आहेत. अनेक आमदारांना तर विमानाचे तिकीट रद्द केल्याचे कंपनीने कळविल्याने उद्या कसे जायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. काही आमदारांना तर विमानाचे तिकीट ऐनवेळी मिळत नसल्याने तर काही जणांना विमानाचे तिकीट काढून विमान वेळेत नाही पोहचलं तर काय असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. ५) काम संपल्यानंतर घेऊ नका बॉसचा फोन ऑफिसचे काम संपल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा ऑफिससाठी उपलबध असण्याची गरज नाही. तुमचे ऑफिसचे काम संपल्यानंतर तुम्ही ऑफिसशी संबंधित कोणाचाही फोन घेण्यास, कुठलेही काम करण्यास तुम्ही बांधील नसाल. याविषयीचे एक विधेयक संसदेमध्ये मांडले गेले असून या विधेयकाचे लवकरच कायद्यामध्ये रुपांतर होऊ शकते. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, डिजिटल आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञान कामात लवचिकता देत असले तरी, ते व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील संतुलनाला अडथळा आणतात. याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होतो, ज्यामुळे मानसिक ताण येतो. हे लक्षात घ्यावे की हे खाजगी सदस्य विधेयक आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले तर ते राज्यसभेत पाठवले जाईल. ६) गोवा स्फोट प्रकरणात २५ जणांचा मृत्यू गोव्यातील अर्पोरा येथील एका क्लबमध्ये भीषण आग लागल्याची दुर्घटना शनिवारी रात्री घडली आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीत तब्बल २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आगीची घटना सिलिंडरच्या स्फोटामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना घडल्यानंतर अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी संवाद साधत घटनेचा आढावा घेतला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला. या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदत आणि जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे. ७) तेव्हा भारत विकासाची कहाणी लिहितो : नरेंद्र मोदी भारत आज जगात एक नवीन ओळख निर्माण करत आहे आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे. दीर्घ काळाच्या गुलामगिरीमुळे भारताचा आत्मविश्वास कमकुवत झाला होता, परंतु आता देश या मानसिकतेवर मात करत आहे आणि नवीन संकल्प आणि नवीन उर्जेने प्रगतीकडे वाटचाल करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की, “कोणताही देश आत्मविश्वासाशिवाय प्रगती करू शकत नाही आणि आज भारत त्या आत्मविश्वासाच्या बळावर उभा आहे. गुलामगिरीची मानसिकता भारताच्या विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा होता, परंतु सरकार या मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. असं मोदींनी यावेळी सांगितले. ८) डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन नियम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हिसा नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नवीन आदेशानुसार, तथ्य तपासणी, सामग्री नियंत्रण, ऑनलाइन सुरक्षा, विश्वास आणि सुरक्षितता किंवा अनुपालन यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींना अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, “हे निर्देश परराष्ट्र विभागाच्या मेमोद्वारे जारी करण्यात आले.” या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर होईल, विशेषतः भारतासारख्या देशांतील अर्जदारांवर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ९) मला माझी मुलं फक्त हुशार नकोत तर : करीना अभिनेत्री करीना कपूर खान दोन मुलांची आई आहे. तिने मुलांसाठी सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर केली आहे. खरंतर करीना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती अनेकदा स्वतःचे फोटो आणि मजेदार मीम्स शेअर करत असते. तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये करीनाने लिहिले की, मला माझी मुले फक्त हुशार असावीत असे वाटत नाही. मला त्यांनी दयाळू असावे असे वाटते. कारण ग्रेड घसरतात, नोकऱ्या बदलतात, ट्रॉफी धूळ पडतात पण चारित्र्य? ते कायमचे सोबत असते, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तिने अशा भावना पोस्टमधून शेअर केल्या आहेत. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी लाईक केले आहे. १०) अखेर स्मृती-पलाशचं लग्न मोडलं भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न अखेर मोडले आहे. स्मृती आणि पलाश या दोघांनी स्वत: याबाबतची सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिलीय. गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल खूप चर्चा सुरू आहेत. मला वाटते की मी यावेळी बोलणे महत्त्वाचे आहे. मी खूप खाजगी स्वभावाची व्यक्ती आहे आणि मला माझे आयुष्य असेच ठेवायचे आहे. पण मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की लग्न रद्द झाले आहे. असे तिने स्पष्ट्पणे सांगितले. तर मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक संबंधांपासून मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे.” मला घाबरवणाऱ्या निराधार अफवांवर लोक प्रतिक्रिया देत आहेत हे पाहून मला खूप दुःख होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा होता. मी ते सौम्यपणे हाताळेन, असं पलाशने म्हटलं आहे.