आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची केली ‘तोडफोड’

सिंधुदुर्ग – नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे जेमतेम वर्षभरापूर्वीच अनावरण करण्यात आले. पण सोमवार (ता. 26 ऑगस्ट) रोजी हा पुतळा कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हा पुतळा नेमका कसा आणि कशामुळे कोसळला आहे? याबाबतची माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही. परंतु, हा पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावरच हल्लाबोल करत तेथे तोडफोड केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 04 डिसेंबर 2023 रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेतेमंडळी उपस्थित होती.
त्यामुळे हा पुतळा उभारून अजून वर्ष देखील झालेले नाही. आणि आता हा पुतळा पूर्णतः कोसळला आहे. त्यामुळे हा पुतळा नेमका कसा उभारण्यात आला होता? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर, नौदल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या कामाबद्दल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून चौकशीची मागणी केली होती. या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आता उपरकर यांच्याकडून करण्यात येत आहे.




