भोर – मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरु केले. जाहीर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भोरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू झाले आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्यासह मराठा बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून 50 टक्क्यांच्या आतमधील आरक्षण देण्यासाठी भोर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण रविवार (दि.29) पासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक शेटेवाडी येथे सुरु केले. आमदार थोपटे यांच्यासह तालुक्यातील 25 गावांतील मराठा बांधवांनी उपोषणात सहभागी होऊन जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.
साखळी उपोषणाला भोर विधानसभा मतदार संघातर्फे पाठिंबा देत असल्याचे थोपटे यांनी जाहीर केले. याप्रसंगी ऋतुजा कोंढाळकर, अश्विनी कोंढाळकर, विकास पासलकर, ऍड. जयश्री शिंदे, सीमा तनपुरे यांनी मराठा आरक्षणाबाबत विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन विठ्ठल पवार यांनी केले.